भगवानगड
भगवानबाबांचे दुर्मिळ छायाचित्र
"संत संगतीचे काय सांगू सुख,आपले पारिखे नाही तिथे हित"
ठिकाण-श्री क्षेत्र भगवानगड
स्थान -भगवानगड,तालुका-पाथर्डी,जिल्हा-अहमदनगर
![]() |
| भगवानगड |
बाबांचे समाधी मंदिर
भगवानगड-महाराष्ट्रतील बीड-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या,नागलवाडी तालुका शेवगाव गावाच्या बाजूला पर्वतावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-२२२ म्हणजेच कल्याण ते विशाखापट्टणम हा जातो,त्यामुळे देवस्थानला पोहचणे खूप सोयीस्कर व अत्यंत सोपे झाले आहे.महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिरे आहेत. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगडाची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाक प्रतीक आहे.शेजारीच काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी गावात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे श्रावण सोमवारला मुख्य उत्सव सुरु होतो.
गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे त्या काळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले.
गडावरील सुंदर देखावा
थोर व्यक्तित्व व संत यांच्याबद्दल काही माहिती
बाबांचे नाव-आबाजी तुबाजी सानप
जन्म-२९ जुलै १८९६
वैकुंठगमन-१८ जानेवरी १९६५
भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता. तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ‘कीर्तन म्हणजे भगवानबाबांचेच' असे लोक गौरवाने म्हणत. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ,तेलंगना,आंध्रप्रदेश,कर्नाटकातील काही भाग व पश्चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यांच्या ऐश्वर्यशाली व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा व कार्याचा त्या काळातील समाजावर फार मोठा प्रभाव पडलेला होता व तो तेवढाच परिणामकारकपणे आजही अनुभवास येतो. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात त्यांना मानणारा मोठा समाज आहे. त्यांनी वार्षिक नारळी सप्ताहाची स्थापना केली. सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धानिर्मूलन, शिक्षणप्रसार, वार्षिक नारळी हरिनामसप्ताह, पंढरपूरवारी यासारखे जनकल्याणचे काम करणारे एक आदर्श समाजमार्गदर्शक, समाजसुधारक होते. भगवानगडाची संस्थापना त्यांनी केली. भगवानगड आज वारकरी धर्म चळवळीचे मोठे केंद्र बनले आहे.
| बाबांचे वस्तू संग्रहालय |
![]() |
| बाबांचे समाधी मंदिर |
आतापर्यंत झालेले काही नारळी सप्ताह
गडावरील ऊत्सव
सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून गडावर विविध ऊत्सव साजरे केले जातात.
विजयादशमी सीमोल्लंघन-दसरा
भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरु होतो. भगवानबाबांचा विजयादशमीचा ऊत्सव साजरा करण्यामागे खेडय़ापाडय़ातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदु:खाची विचारांची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथील विजयादशमीला वैभवशाली इतिहासाची ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. गडावर विजयादशमीला गुरूपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक जाती-धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येतात. येथे विजयादशमीला 'सीमोल्लंघन उत्सव' साठी भाविकांची रीघ लागते. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते.
![]() |
| दसरामेळाव्याची गर्दी |
भगवानबाबांची पुण्यतिथी
श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवानबाबांची पुण्यतिथीनिमित्त पौष वि प्रतिपदेला म्हणजेच २१ जानेवारी ला हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी गडावर भगवानबाबांचा सप्ताह सुरु होतो व पुढे आठ दिवस चालतो. यावेळी भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दोन-तीन लाखो भाविकांची गर्दी उसळते.
भगवानबाबांची समाधी
पालखी
भगवानबाबांनी आपल्या कार्यातील बराच काळ नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तनकारणे त्यांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे.भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा सुरु केली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबांची पालखी पंढरपूरला बाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी, करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा मार्गे जाते. पादुकास्थान पंढरपूर येथे संत एकनाथांच्या पालखीला आडवी जाण्याचा मान या पालखीला आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह वगैरे सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात.संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे.
गडाचे सामजिक कार्य
१.प्रत्येक येणाऱ्या भाविकाला जेवणाची दुपार व संध्याकाळी सोय,म्हणूनच म्हणतात कि भगवानगडावर जाणारा माणूस कधी रिकाम्या पोटी येत नाही.
प्रसादालय
२.१ मे २०१८ पासून गडावर ८वी ते १०वी च्या विध्यार्थ्यांसाठी विनामुल्य वस्तीगृह सुरु झाले आहे.
विशेष:
भिलवडे हे असं एकमेव गाव आहे जिथं संत श्रेष्ठ भगवानबाबा व वामनभाऊ यांची भेट झाली होती.तिथ या दोन महान संतांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणी च्या मूर्तीची प्रतिस्थापना झाली होती.
भिलवडे येथील भाऊ-बाबांनी स्थापना केलेले मंदिर





